👉 आशियाई विकास बँकेसोबत चर्चा; कृषी, गुंतवणूक आणि विपणन क्षेत्राला मिळणार नवी दिशा
👉-अशोक गिरासे (दोंडाईचा):
महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल सध्या फिलीपिन्स दौऱ्यावर असून त्यांनी आशियाई विकास बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत राज्याच्या विकासासाठी विविध धोरणात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा पार पडली.
खानदेशचे भूमिपुत्र म्हणून ओळख असलेले नामदार जयकुमार रावल हे महाराष्ट्रातील तत्पर, कार्यशील आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. उच्चशिक्षित असलेल्या रावल यांना अनेक विदेशी भाषा अवगत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी संवाद साधण्याची क्षमता ही राज्यासाठी एक मोठी जमेची बाजू मानली जाते. प्रशासनातील वेगवान निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख दृष्टीकोनामुळे त्यांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
फिलीपिन्समधील मनीला येथे आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत महासंचालक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्याच्या विपणन व्यवस्थेला चालना देणे, आयात-निर्यात वाढवणे, तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, तसेच ज्ञान व अनुभवाचे आदान-प्रदान या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. भविष्यात परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, मनीला येथील मुख्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय पॅनल चर्चेत नामदार रावल यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आपले विचार प्रभावीपणे मांडले. या चर्चेत विविध देशांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूमिका अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून आले.
तसेच, रावल यांनी आशियाई विकास बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत मॅग्नेट प्रकल्प, मुंबई इंटरनॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट, तसेच राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणाबाबत सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजारपेठ अधिक सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
या भेटीदरम्यान नामदार रावल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भारत व महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण देखील दिले. त्यामुळे भविष्यातील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे मार्ग अधिक खुले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, महाराष्ट्राच्या कृषी, उद्योग आणि विपणन क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी दिशा देण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरत असून, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.














