स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेच्या शिक्षणमहर्षी दादासाहेब राऊळ प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात


दप्तर, गणवेश, पुस्तके व डेस्क वाटप; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण स्वागत

 

दोंडाईचा | प्रतिनिधी

 

दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार, दि. १५ जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. दोंडाईचा येथील स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेच्या शिक्षणमहर्षी दादासाहेब राऊळ प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे आगमन अविस्मरणीय ठरावे यासाठी भव्य प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचा किलबिलाट, ढोल-ताशांचा गजर, रंगीबेरंगी फुलांची उधळण आणि स्वागताच्या जयघोषांनी संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.

 

शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे फुले, चॉकलेट व शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आनंदोत्सवात सहभाग नोंदविला. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान हे प्रवेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले.

 

यंदाच्या शैक्षणिक वर्षाची विशेष बाब म्हणजे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना मोफत दप्तर, डेस्क, पुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य पहिल्याच दिवशी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा मोठा लाभ होणार असल्याने पालकांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांचे आभार मानले.

 

प्रवेशोत्सव कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी सी. एन. राजपूत, माजी प्राचार्य तथा सहाय्यक सेक्रेटरी डी. एन. जाधव, माजी विद्यार्थी व नगरसेवक जितेंद्र जयसिंग गिरासे, विधानसभा निवडणूक प्रमुख के. पी. गिरासे, नगरसेवक चतुर पाटील, नगरसेवक संजोग रामोळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक महेंद्रसिंग गिरासे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी नव्या दप्तरांसह गणवेश परिधान करून शिक्षणाच्या नव्या प्रवासाला उत्साहाने सुरुवात केली. उपस्थित पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा योजनांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सेक्रेटरी सी. एन. राजपूत यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी शाळेला मोफत दप्तर व डेस्क उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांचे विशेष आभार व्यक्त केले.

 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महेंद्रसिंग गिरासे यांनी उपस्थित मान्यवर, पालक व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह संस्कारमूल्यांचे शिक्षण देण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळालेला प्रेमळ सन्मान, शैक्षणिक साहित्याची भेट आणि उत्साहवर्धक वातावरण यामुळे हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!