(प्रतिनिधी ✍️श्री. पांडुरंग शिंंपी)
दोंडाईचा: दोंडाईचा शहर व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक असलेली राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे संतप्त विद्यार्थी व पालकांनी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची जोरदार मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण महाजन शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे व पदाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दोंडाईचा शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी दररोज एसटी बसवर अवलंबून असतात. मात्र, गेल्या वर्षभरात अनेक मार्गांवरील बस सेवा बंद करण्यात आली असून काही बसेस शाळा व महाविद्यालयांच्या वेळांशी विसंगत अशा वेळेत चालविल्या जात आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः सोनशेलु, मेथी, वरझडी, देगाव, लोहगाव, कोळदे, कर्ले, रामी, खोकराळे आदी गावांमधील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून अनेकांना वेळेत शाळेत पोहोचणे शक्य होत नाही. काही विद्यार्थ्यांना तर प्रवासाची सोय नसल्यामुळे शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त विद्यार्थी, पालक व नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या दोंडाईचा आगार व्यवस्थापनाकडे निवेदन देत सर्व मार्गांवरील बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेनुसार बसचे वेळापत्रक निश्चित करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
जर प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष दिले नाही, तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संबंधितांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे असे निवेदन दोंडाईचा आगार व्यवस्थापक मिलिंद परदेसी यांना भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण महाजन शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे बांधकाम सभापती मुकेश देवरे नगरसेवक कृष्णा नगराळे जितेंद्र डि गिरासे संजोग रामोळे संजय तावडे इ पदाधिकाऱ्यांनी दिले तसेच निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री मा ना जयकुमार भाऊ रावल विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धुळे विभाग यांना पाठविण्यात आले.








