मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील प्राणी जन्म नियंत्रणाविषयी महत्वपूर्ण बैठक संपन्न
आज दि. 10 डिसेंबर बुधवार रोजी शिंदखेडा नगरपंचायत तर्फे शहरातील प्राणी जन्म नियंत्रण(ABC) कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी माननीय मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण व सविस्तर बैठक घेण्यात आली. शहरात वाढत्या भटक्या प्राण्यांच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच निर्बिजीकरण, लसीकरण व सुरक्षित व्यवस्थापन या सर्व प्रक्रियांमध्ये संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढविण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत शिंदखेडा शहरातील विविध विभाग व शैक्षणिक संस्थांमधून नियुक्त नोडल अधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. बैठकीस ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. हीतेंद्र पवार, पशुवैद्यकीय दवाखान्याचे एस. एस. साळुंखे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या श्रीमती बुद्ध प्रिया भामरे, जनता हायस्कूलचे एम. डब्ल्यू. तमखाने, एम. एच. एस. हायस्कूलचे राजेश सूर्यवंशी, तसेच नगरपंचायतीचे विपुल साळुंखे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता, रविंद्र पाटील शहर समन्वयक आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी उपस्थितांना शहरातील भटक्या प्राण्यांची सद्यस्थिती, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीची कायदेशीर तरतुदी, ABC कार्यक्रमाचे उद्दिष्ट, अंमलबजावणीची योग्य पद्धत, तसेच नागरिकांचा सहभाग या सर्व बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले. निर्बिजीकरण मोहीम राबविताना प्राण्यांचे मानवी पद्धतीने पकडणे, त्यांचे वैद्यकीय परीक्षण, लसीकरण, ऑपरेशननंतरची काळजी या प्रक्रियांमध्ये काटेकोरपणे नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वेगवेगळ्या विभागांनी या मोहिमेसाठी एकत्रितरीत्या काम करण्याची गरज अधोरेखित करताना, प्राणी नोंदणी, भटक्या प्राण्यांची संख्या निर्धारण, संभाव्य समस्यांची नोंद, नागरिकांसोबत संवाद साधणे आणि शाळांमार्फत जनजागृती वाढविणे या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. शाळांमधील नोडल अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबवावेत, इत्यादी महत्वपूर्ण सूचना यावेळी सदर बैठकीत देण्यात आल्या.
नगरपंचायतीचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, आरोग्य शाखा, पशुवैद्यकीय विभाग, ग्रामीण रुग्णालय आणि परिवहन महामंडळ यांच्यात ABC कार्यक्रमासाठी समन्वय वाढविणे आणि माहितीची देवाण-घेवाण सुलभ करण्याबाबत विशेष चर्चा करण्यात आली. शहरातील भटक्या प्राण्यांच्या समस्येवर शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन देखील सदर बैठकीत करण्यात आले.
या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, प्राण्यांची वाढती संख्या नियंत्रित व्हावी आणि आरोग्यविषयक धोके टाळता यावेत, यावर सर्व उपस्थित मान्यवरांनी एकमत व्यक्त केले. नगरपंचायतीमार्फत येत्या काही दिवसांत ही मोहीम आणखी गतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
संपादक जतीन बोरसे..!









