शीख धर्माचे नववे धर्मगुरू गुरु तेग बहादुर जयंतीनिमित्त जनता हायस्कूल शिंदखेडा येथे निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न..!!
शिंदखेडा | भारतीय संस्कृतीतील शीख धर्माचे नववे धर्मगुरू गुरु तेग बहादुर यांच्या जयंतीनिमित्त जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिंदखेडा येथे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गुरू तेग बहादुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्राचार्य श्री. एस. एस. पाटील यांच्या शुभहस्ते अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी पर्यवेक्षक श्री. बी. जे. पाटील, श्री. एस. ए. पाटील, श्री. एस. के. जाधव, श्री. डी. एच. सोनवणे, वरिष्ठ लिपिक श्री. किशोर पाटील यांच्यासह शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या औचित्याने शिंदखेडा पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत इयत्ता आठवी ते बारावीच्या तब्बल 120 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी उपशिक्षक श्री. ए. टी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादुर यांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी गुरूंचा जन्म व बालपण, गुरुपदाची जबाबदारी, धर्मरक्षणासाठी केलेले कार्य, काश्मिरी पंडितांसाठी उचललेला आवाज, औरंगजेबाला दिलेले निर्भीड आव्हान तसेच त्यांच्या शौर्यामुळे मिळालेली ‘हिंद दी चादर’ ही उपाधी याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. ए. पाटील यांनी केले, तर मान्यवरांचे आभार श्री. जे. डी. बोरसे यांनी मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची जाणीव, धर्मसहिष्णुता आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
मुख्य संपादक जतीन बोरसे सर, शिंदखेडा✍️









