धुळ्यात चोरांचा ‘फुल कॉन्फिडन्स’! थेट जिल्हा न्यायालयाच्या आवारातून दुचाकी लंपास; कायद्याच्या आवारातच चोऱ्यांचा धुमाकूळ


धुळे (प्रतिनिधी):

 


धुळे शहरात दुचाकी चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, आता चोरांची मजल चक्क जिल्हा न्यायालयाच्या आवारापर्यंत पोहोचली आहे. भरदिवसा न्यायालयाच्या आवारातून दुचाकी चोरीला गेल्याने शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नेमकी घटना काय?

पारोळा रोडवरील रहिवासी कुणाल राजेंद्र लोंढे हे तरुण १३ फेब्रुवारी रोजी काही कामानिमित्त धुळे जिल्हा न्यायालयात आले होते. त्यांनी आपली दुचाकी न्यायालयाच्या परिसरातील एका झाडाखाली पार्क केली आणि ते कामासाठी आत गेले. मात्र, काम आटोपून बाहेर आले असता त्यांना आपली दुचाकी गायब असल्याचे दिसले. सर्वत्र शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने त्यांनी अखेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुणाल लोंढे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शासकीय कार्यालये चोरट्यांचे ‘टार्गेट’!

केवळ न्यायालयच नव्हे, तर धुळ्यातील हिरे रुग्णालय आणि इतर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या गाड्यांवर चोरटे पाळत ठेवून असतात. ‘डिटेक्शन रेट’ (तपास लागण्याचे प्रमाण) कमी असल्याने चोरट्यांना कुणाचेही भय उरलेले नाही, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

या घटनेमुळे दुचाकी चोरीच्या तक्रारी नोंदवताना होणाऱ्या दिरंगाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेकदा तक्रारदाराला कागदपत्रांच्या नावाखाली फिरवले जाते, ज्यामुळे चोरांना पळून जाण्यास पुरेसा वेळ मिळतो. गुन्ह्यांचा आलेख कागदावर कमी दाखवण्यासाठी पोलीस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही आता जोर धरू लागला आहे.

​न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी जर गाड्या सुरक्षित नसतील, तर सामान्यांनी जायचे कुठे? असा संतप्त सवाल धुळेकर विचारत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!