ग्रामीण शिक्षणाला डिजिटलचे बळ….
आमदार सत्यजीत तांबे यांच्या निधीतून शिंदखेड्यात 20 शाळांना डिजिटल ऑडिओ पोडियमचे वाटप
शिंदखेडा I– आज दि. 25 फेब्रुवार बुधवार रोजी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या निधीतून आणि धुळे जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे उपाध्यक्ष परीक्षित देशमुख यांच्या प्रयत्नातून शिंदखेडा तालुक्यातील तब्बल 20 शाळांना डिजिटल ऑडिओ पोडियम स्टँडचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये डिजिटल साधनसामग्रीची भर पडली असून विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेला आधुनिकतेची जोड मिळणार आहे.
या वितरण सोहळ्यास शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, काँग्रेसचे नगरसेवक राहुल पाटोळे, धमाणे गावाचे माजी सरपंच आबा मुंडे पाटील, दोंडाईचा शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल माणिक, महिला काँग्रेसच्या छाया पाटील, आमदार सत्यजीत तांबे यांचे शिंदखेडा विधानसभा संपर्क प्रमुख मनोज मेहेत्रे, अजय भोई, अभिजित गोसावी यांच्यासह तालुक्यातील 20 शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात नूतन माध्यमिक विद्यालय, दोंडाईचा व माध्यमिक विद्यालय, होळ येथील प्राचार्य नंदलाल बागल आणि मुख्याध्यापिका छाया पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “डिजिटल ऑडिओ पोडियममुळे शाळांमध्ये सभा, व्याख्याने आणि शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतील. ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणे ही काळाची गरज आहे.”
या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना परीक्षित देशमुख यांनी शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही त्यांनीच केले. शेवटी अजय भोई यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या उपक्रमामुळे शिंदखेडा तालुक्यातील शाळांमध्ये डिजिटल सक्षमीकरणाची नवी पायरी गाठली गेली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.









